लोकजागर परिवाराचे प्रवीण गीते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सहदेव लाड यांच्यासह ग्रामस्थांची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील ५० हून अधिक शाळकरी मुलींना रुम्हणा येथील शाळेत सुरक्षितपणे ये-जा करता यावी, यासाठी तात्काळ शालेय बस उपलब्ध करून देण्याची मागणी लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीण गीते, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड तसेच ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी, सिंदखेडराजा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवखेड ते रुम्हणा हे अंतर सुमारे साडेतीन किलोमीटर असून देवखेड गावात प्रामुख्याने शेतकरी व शेतमजूर कुटुंबे वास्तव्यास आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलींच्या दैनंदिन प्रवासासाठी खाजगी वाहनांचा खर्च पालकांना परवडत नाही. परिणामी, अनेक शाळकरी मुलींना दररोज पायी शाळेत जावे लागते.
शाळकरी मुलींना दररोज एवढ्या अंतराचा पायी प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थिनींचे शिक्षण अखंडित राहावे आणि त्यांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा मिळावी, यासाठी शिक्षण विभागाने तातडीने शालेय बसची व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
प्रशासनाने या मागणीकडे तात्काळ सकारात्मक दखल न घेतल्यास लोकजागर परिवार, क्रांतिकारी शेतकरी संघटना व ग्रामस्थांच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निवेदनावर प्रवीण गीते, सहदेव लाड, संदीप भोसले, प्रकाश खरात, अधिकार खरात, संजय खरात, पंजाब खरात, सतीश खरात, पंकज खरात, अंकुश काकडे, कुंदन खरात, लखन खंडागळे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments