मेहकर , लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सारंगपूर आणि बरटाळा शिवारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेऊन मेहकर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी बंदूक (कट्टा), जिवंत काडतूस बनवण्याचे साहित्य, तलवार आणि चोरीची मोटारसायकल असा एकूण मोठा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.सारंगपूर येथील ग्रामस्थांकडून पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना माहिती मिळाली की, काही संशयास्पद तरुण परिसरात फिरत आहेत. या माहितीवरून तात्काळ पोलीस निरीक्षक आलेवार यांनी सपोनि अवचार व पथकासह सापळा रचून एका संशयायित इसमाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी बनावटीची गावठी बंदूक, प्लास्टिकच्या डब्यात बंदुकीची दारू,छर्रे आणि एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल आढळली.पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता, त्याच्याकडील मोटारसायकल ही मालेगाव (जि. वाशिम) येथून चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले (अपर क्र. १६१/२०२६). आरोपीने अजूनही काही चोऱ्या केल्या असाव्यात या संशयावरून पोलिसांनी त्याच्या शेंदला (ता. मेहकर) येथील घरात 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवले. यावेळी त्याच्या घरातून धारदार घातक शस्त्रे जप्त करण्यात आली.जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, १ लोखंडी बनावटीची गावठी बंदूक, बंदुकीची दारू आणि १७२ नग छर्रे, १ लोखंडी तलवार,१ काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, रिंग, लोखंडी बेस आणि इतर साहित्य आढळून आले.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव धरमसिंग प्रतापसिंग बावरी (वय २७ वर्ष, रा. शेंदला) असे असून, त्याच्या विरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि कांचन जारवाल करत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार , सपोनि आदिनाथ मोरे, सपोनि अशोक अवचार, पोउपनि कांचन जारवाल, सुरेश काळे, लक्ष्मण कटक, विजय बेंडवाल, मोहम्मद परसुवाले, इब्राहिम परसुवाले, शिवानंद तांबेकर, राजकुमार कंकाळ आणि आम्रपाली सरकटे आदींनी कारवाई केली आहे.
या धाडसी कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे मोठे कौतुक होत असून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

Post a Comment
0 Comments