Type Here to Get Search Results !

मेहकर उपविभागात शेलगाव देशमुख येथील शेतकऱ्यांना पोकराअंतर्गत प्रथम लाभ


 मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील प्रगतशील शेतकरी विष्णु तुकाराम आखरे यांना स्प्रिंकलर सिंचन संचासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील अनुदान अवघ्या १५ दिवसांत मंजूर होऊन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. विशेष म्हणजे मेहकर उपविभागातील मेहकर , लोणार ,सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तालुक्यात अनुदान थेट खात्यात जमा होणारे विष्णु तुकाराम आखरे हे पहिलेच लाभार्थी ठरले आहेत.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) टप्पा-२ ही योजना हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असून, या अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी जागतिक बँक व कृषी विभागाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य पुरविले जाते. विशेषतः सूक्ष्म सिंचन पद्धती, फळबाग लागवड, शेडनेट हाऊस, ग्राम बीजोत्पादन आदी घटकांवर भर देण्यात येतो. सदर प्रकरणात ग्राम कृषी विकास संजीवनी समितीमार्फत कृषी सहाय्यक अधिकारी संजाब पिसे समूह सहाय्यक अधिकारी आकाश झनक,उपकृषी अधिकारी प्रदीप खंदारे व समिती सदस्यांच्या उपस्थितीत वेळोवेळी मार्गदर्शनपर बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शनाचा लाभ घेत विष्णु तुकाराम आखरे यांनी नियमानुसार महाविस्तार ॲपवर वेळेत अर्ज सादर करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्प्रिंकलर संचावर कायमस्वरूपी एम्बोसिंगने नावे टाकून केली. त्यानंतर कृषी विभागामार्फत स्थळ तपासणी प्रक्रिया पूर्ण करून अल्पावधीतच अनुदान मंजूर करण्यात आले व रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली. या वेगवान आणि पारदर्शक प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये शासन योजनांबाबत विश्वास अधिक दृढ झाला असून, इतर शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनवाढीस चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाचे मत आहे. पोकरा टप्पा-२ अंतर्गत उपलब्ध विविध घटकांचा ग्राम बीजोत्पादन, शेडनेट गृह, सूक्ष्म सिंचन, फळबाग लागवड योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे,मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी तुषार वाघ, मेहकर तालुका कृषी अधिकारी किशोर काळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments