बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
ग्राम रोजगार सहाय्यक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने ग्राम रोजगार सहाय्यकांच्या वतीने राज्यभरात काम बंद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन बुधवार १ एप्रिल पासून करण्यात आले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सहाय्यक काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख यांनी दिली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत करण्यात आलेल्या नव्या बदलांमुळे ग्राम रोजगार सहाय्यकावर अतिरिक्त ताण पडत आहे. या योजनेचे विकसित भारत जी रामजी असे नामांतर करताना इकेवायसी व एनएमएमएस ॲपद्वारे चेहरा आधारित उपस्थिती नोंद सक्तीची करण्यात आली आहे.हे काम करण्यासाठी पुर्ण दिवस लागणार आहे.मात्र ग्राम रोजगार सहाय्यक यांची नियुक्ती अर्धवेळ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय काढून ग्राम रोजगार सहाय्यक यांना ८ हजार रुपये मासिक मानधन व २ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले मात्र अद्याप ग्रामरोजगार सहाय्यक यांना मानधन मिळाले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार सहायक यांनी मासिक मानधन देण्यात यावे व पूर्णवेळ नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.याबाबत मेहकर तालुका ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष परमानंद अवसरमोल व पदाधिकारी, ग्राम रोजगार सहाय्यक यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तर जिल्हा संघटनेतर्फे जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्रीमंत देशमुख, जिल्हा सचिव पृथ्वीराज गवई, जिल्हा संघटक संजय मोरे, ज्ञानेश्वर गावंडे, सुरज रगड, दीपक गवई, अर्जुन ढगे, मदन खरात, दिनकर मोरे, सुरेंद्र कहाळे, ज्योतीराम इंगळे, सुनील पहुरकर शेगाव, नेपाल सिंग राजपूत, संदीप मापारी, विलास कोकाटे व मनोज सातव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



Post a Comment
0 Comments