मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
घाटबोरी येथे मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने जातिय सलोखा,पोलीस प्रशासन व पत्रकार सुसंवाद, जेष्ठ नागरिक, पत्रकार, गुणवंत विद्यार्थीयांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानबा पाटील नवले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, गटविकास अधिकारी दिनकरराव खरात तर अतिथी म्हणून पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप मेटागंळे, डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे,मंडळ अधिकारी महादेव गायकवाड, सरपंच राजकुमार पाखरे, जेष्ठ पत्रकार सिध्देश्वर पवार, श्रीकृष्ण काकडे, हमीद मुल्लाजी, अंकुश राठोड, कैलास राऊत, ग्रामविकास अधिकारी शरद वानखेडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रथम दिपप्रज्वलन करून आयोजकांनी मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .प्रास्ताविक मनोगतातून माजी सरपंच तथा अध्यक्ष गजानन चनेवार व संतोष अवसरमोल यांनी या कार्यक्रम आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, गुणवंत विद्यार्थ्यांसह गांवातील जेष्ठ मंडळीचा मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करत अनेक काबाडकष्ट करून आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण करणाऱ्या आई वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा, यशश्री खेचून आणा, जन्मदात्याची मान स्वाभिमानाने गांवात उंच करा, असे मत व्यक्त केले.
तर अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी गांवात जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहाण्यासाठी आजच्या युवक मंडळीने जेष्ठ नागरिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करा, धोती, टोपी व पटक्याची परंपरा जपणारे जेष्ठ आपल्या गांवाचे वैभव असुन अनुभव, ज्ञान आणि संस्कारांचा अनमोल खजिना आहे, थोर पुरषांचे विचाराने प्रेरित व्हावा, ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांनी लेखणीचा उपयोग जनजागृती, सर्व सामान्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व आदर्श समाज घडविण्यासाठी करावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन प्रा कृष्णा हावरे तर आभार प्रदर्शन विष्णू आखरे पाटील यांनी केले. या सुसंवाद कार्यक्रमाला पत्रकार, जेष्ठ नागरिक,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट चित्रीकरण पत्रकार समाधान पदमने यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी पत्रकार संघाचे सदस्य व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.


Post a Comment
0 Comments