Type Here to Get Search Results !

मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात 23 वर्षांनी भरली शाळा


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित, डोणगाव येथील मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल 23 वर्षांनी वर्ग 10 च्या 2003 च्या बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. प्रत्येक जण जीवनात कुठे ना कुठे स्थिर झाल्यानंतर पूर्णतः स्वतःमध्ये गुंतून जातो. परंतु आयुष्यामध्ये एवढेच पुरेशी नसून बालपणाची मैत्री कायमस्वरूपी जिवंत करण्याची महत्त्वाकांक्षी भूमिका माजी विद्यार्थी मेळाव्याच्या रूपाने विद्यालयामध्ये पाहायला मिळाली. विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन प्राचार्य अरविंदराव असोलकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा विद्यालयाचे पालक संचालक गोपाल बोरा , माजी प्राचार्य राजेंद्र उमाळे, त्रंबक मोरे तसेच ज्येष्ठ शिक्षक अनिल कुलकर्णी, अरुण मुगल , मुकुंद पिंपरकर , शेषराव गवई ,मीना खेर्डीकर ,लक्ष्मी लोलूरे, गणेश इंगळे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.तसेच याप्रसंगी पातुरकर विद्यालयाचे स्थानिक सल्लागार बबनराव गोरे व नागेश राजबिंडे यांची सुद्धा उपस्थिती लाभली. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती व कै.मदनसा वामनसा पातुरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व शिक्षक बंधू भगिनींचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व यथोचित सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी मेळाव्याला वर्ग 10 (ब ) चे सर्व विद्यार्थी जे 2003 साली विद्यालयामध्ये शिकले. त्यांनी एकत्रित येऊन अतिशय वेगळ्या स्वरूपाने आठवणींना उजाळा दिला. बालमित्रांच्या व शिक्षकांच्या भेटीगाठी घडून याव्यात म्हणून त्यांनी परिश्रम घेऊन माजी विद्यार्थ्यांची शाळा विद्यालयामध्ये भरवली. अनेक माजी विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जीवनामध्ये उत्तुंग यश संपादन केले. खूप मोठ्या पदावर सध्या ते कार्य करत असतांना विद्यालयामध्ये मिळालेले शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे ठरले व त्यामुळे जीवन बदलले ही भावना विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. प्रत्येक माजी विद्यार्थ्याने आपल्या परिचयातून आपल्या संपूर्ण कुटुंबाची माहिती दिली व प्रत्येकाने सुखी असल्याची भावना व्यक्त केली. प्रत्येकाने एकत्रित आल्याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही अशी भावना व्यक्त केली. जीवनामध्ये मित्रत्व अतिशय महत्त्वाचे असून प्रत्येक सुखदुःखाप्रसंगी सर्वात महत्त्वाची भूमिका ही मित्रांची असते त्यामुळे हे नाते अतिशय महत्त्वाचे आहे ही भावना प्रत्येकाने व्यक्त केली व अतिशय आनंदामध्ये हा दिवस त्यांनी एकत्रित येऊन साजरा केला. याप्रसंगी विद्यालयाच्या ग्रंथालयाला या विद्यार्थ्यांकडून पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला .या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नारायण सुर्वे व संदीप राठोड यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संदीप राठोड व नयना काटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश पवार यांनी केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments