मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय घेण्यात यावेत याकरिता संभाजी ब्रिगेड बुलढाणा जिल्हाध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसील कार्यालयामार्फत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीची जाणीव करून देत अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे अत्यंत गरजेचे आहे असे सदर पत्रात पाटील यांनी नमूद केले आहे. यामध्ये प्रामुख्याने वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल नमूद करून सदर वन्य प्राणी त्यामध्ये निलगाय व हरीण यांची संख्या प्रचंड वाढून एका कळपात 150 ते 200 प्राणी एवढी वाढ झाली आहे. सदर वन्य प्राणी हे नुकत्याच एकामंत्र्यांनी वाघांसाठी बकऱ्या जंगलात सोडण्याचे घोषित केल्याप्रमाणे बकऱ्यांऐवजी सदर वन्य प्राणी पकडून जंगलात सोडावेत व ते वनक्षेत्र बंदिस्त करावे किंवा शेतकऱ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर कुंपण योजना राबविण्यात यावी. त्याचबरोबर विनाअटी शर्ती कर्जमाफी करून सरसकट सातबारा कोरा करावा. व जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये जे शेतकरी मयत झाले आहेत त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कारणांमुळे मागील कर्जमाफीपासून पात्र असतानाही वंचित राहिलेले शेतकरी कुटुंब यांच्याबाबतीतही ठोस निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांचे निसर्गाच्या अनियमत्तेमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना आधार असणारी एक रुपयात पिक विमा योजना व बंद केलेले चारही ट्रिगर ज्यामध्ये पिकाची पेरणी करता न येणे (PS), स्थानिक नैसर्गिक आपत्ती (LC), मध्य हंगाम मधील प्रतिकूल परिस्थिती (MSA), पिकाचे काढणी पश्चात नुकसान (PH) हे सर्व चालू करून पूर्ववत पिकविमा योजना चालू करण्यात यावी. तसेच 2023 व 2024 या वर्षातील अनेक शेतकऱ्यांचे मंजूर होऊनही आजपर्यंतचे रखडलेले पिक विमे तात्काळ जमा करण्यात यावे. अशा प्रकारच्या प्रमुख मागण्या सदर पत्रामध्ये करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या मागण्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका व जिल्हाभरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्याप्त स्वरूपाचे जन आंदोलन उभारण्यात येईल. व त्यातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस पूर्णपणे शासन प्रशासन व मुख्यमंत्री जबाबदार राहतील अशा प्रकारचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे गोपाल गरड, भागवतमामा बाजाड,प्रवीण काळदाते इतर पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनाही पाठवण्यात आली.

Post a Comment
0 Comments