डोणगाव, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
शिक्षण प्रसारक मंडळ चिखली द्वारा संचालित मदन वामन पातुरकर विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, डोणगाव. ता. मेहकर जि. बुलडाणा येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कु. ज्ञानेश्वरी बाजड (वर्ग - 9 वा ) तर प्रमुख वक्ता म्हणून कु. गायत्री दांदडे ( वर्ग-9 वा) या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच प्राचार्य रमेश जाधव,शिक्षक गव्हले, टेकाळे, मुगल, उंडाळ, प्रा.शेळके, शिक्षिका कुलकर्णी, पाटील, जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेषभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. इयत्ता 5 ते 9 आणि वर्ग 11 च्या विद्यार्थ्यांनी भाषणे,पोवाडे,नृत्य इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाची मार्गदर्शिका कु.गायत्री दांदडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार आपल्या सर्वांसाठी नेहमीच आदर्श राहतील असे सांगितले. प्राचार्य रमेश जाधव सर यांनी आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचे स्मरण ठेऊन कार्यरत राहिले पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेली कु. ज्ञानेश्वरी बाजड या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांनी दिलेला संदेश नेहमी स्मरणात ठेवून आपण आपले वर्तन ठेवावे असे प्रतिपादन केले.या संपुर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिक्षक दत्तात्रय उंडाळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मनस्विनी बनसोड या विद्यार्थिनीने केले तर कु.श्रृती खारट हिने उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी , शिक्षक- शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू- भगिनींचे सहकार्य लाभले.

Post a Comment
0 Comments