बु
लढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
चिखली नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश नारायणराव गावंडे आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित परिवर्तन सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
चिखलीतील पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी, मूलभूत सोयींच्या समस्या व अन्य प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी नेतृत्वाला अनुभव असणं अत्यंत गरजेचं आहे. प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांसह बाकी आमच्या उमेदवारांना सार्वजनिक कामातील भक्कम अनुभव आहे. काही उमेदवार नवे आहेत, काही अनुभवी आहेत, पण सर्वांमध्ये काम करण्याची क्षमता आणि तयारी आहे, अशी खात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिली.
चिखली शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. विकासकामांना सर्वोतोपरी मदत करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. अनेक भागांमध्ये CSR च्या माध्यमातून निधी आणण्याचं काम आम्ही केलं आहे आणि हे काम पुढेही वेगानं सुरू राहील, असं स्पष्ट केलं. उमेदवार निलेश गावंडे यांचा प्रामाणिकपणा आणि ज्ञान चिखलीच्या विकासासाठी मोठी ताकद ठरेल. सर्व कामं दर्जेदार, उत्कृष्ट आणि पारदर्शकपणे पार पडावीत, हीच आमची भूमिका आहे. चिखलीला भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त करणं, हे आमचं उद्दिष्ट आहे. चिखलीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशा भावना आजच्या परिवर्तन सभेच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांना नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या. त्यांच्या नावासमोरील बटन दाबा आणि चिखलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे या, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

Post a Comment
0 Comments