Type Here to Get Search Results !

मुलांना दत्तक घेण सोपं पण बाप होऊन पालनपोषण करणे सोपी गोष्ट नाही


लेखक,अंजली झरकर 

विदर्भातल्या एका गावात खिरोडा पुलावरून एक बस कोसळते आणि त्याच्या मधले जवळपास सगळे प्रवासी मृत्युमुखी पडतात. त्या अपघाताची चौकशी करण्यासाठी त्या जिल्ह्यातील समाजकारणात, राजकारणात सक्रिय असणारा तरुण म्हणजे रविकांत तुपकर मृत्युमुखी पडलेल्या सर्व लोकांच्या कुटुंबाला भेट द्यायला जातो. सगळ्यांची चौकशी करता करता ते शेवटच्या घराजवळ येतात. अत्यंत लहान घर. बाजेवर एक म्हातारी पडलेली. दोन लहान मुली आणि एक तान्हा मुलगा इतकाच परिवार शिल्लक उरलेला.

दुर्दैवाने त्या लहान मुलांचे आई-वडील त्या अपघाताने हिरावून घेतलेले.


ती सगळी परिस्थिती पाहून सगळेजण हेलावून जातात पण तो तरुण जबाबदारीने पुढे येतो. तो म्हणतो या मुलांचा बाप व्हायला मी तयार आहे या मुलांची जबाबदारी मी घेतो! इतकं बोलून तो थांबत नाही तो त्या तीन मुलांना दत्तक घेतो. सांभाळतो,मोठे करतो. त्या मुलांसाठी तो तरुण आणि त्याची पत्नीच आई वडील बनतात. त्यातली मोठी मुलगी वैष्णवी त्यावेळी पहिलीला होती आज सांगलीच्या प्रतिथयश अशा वालचंद इंजिनियरिंग कॉलेजमध्ये इंजीनियरिंगचे दुसरे वर्ष ती पूर्ण करत आहे. तिची छोटी बहिण श्रेया यावर्षी बारावीला आहे. श्रेयाचा भाऊ देखील कॉलेजला आहे. या तीन मुलांचा सांभाळ ज्यांनी केला तो तरुण म्हणजे आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेपासून कामाची सुरुवात करून रविकांत तुपकर यांनी स्वतःची क्रांतिकारी शेतकरी संघटना स्थापन केली आणि स्वतःची वाटचाल पुढे चालू ठेवली आहे..


रविकांत तुपकरांची ही मुलाखत जेव्हा मी ऐकली होती तेंव्हाच या गोष्टीबद्दल लिहायचं ठरवलं होतं. त्यांची आणि माझी व्यक्तीश: कुठली ओळख नाही परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात जे लोक काम करत असतात त्यांच्याबद्दलच्या अपडेट एक सुजाण नागरिक आणि वकील म्हणून मी ठेवते.  


समाजकारण हा राजकारणाचा पाया असतो. ज्याला लीड करण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी किंवा नेतृत्व गुण किती आहेत किंवा नाहीत हे बघण्यापेक्षा त्याच्या हृदयामध्ये सहवेदना किंवा इंग्लिश मध्ये ज्याला empathy म्हटले जाते ती कितपत प्रमाणात जिवंत आहे ते बघणे गरजेचे असते. रविकांत तुपकर यांनी ती empathy फक्त दाखवली नाही. स्वतःच्या आयुष्यात implement देखील केली. जिथे कोर्टात सख्खा बाप आपल्या लहान मुलांचे पालनपोषण करणे नाकारताना वकिलांनी बघितलेले असते तिथे आई वडिला विना वाढलेल्या मुलांची पूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे आव्हानात्मक काम असते. त्यामुळे तुपकर साहेबांचे आणि वहिनींचे विशेष कौतुक. 💐💐


अंजली झरकर..

Post a Comment

0 Comments