लोणार, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असले तरी या उत्साहात काही व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसून येत आहे. परवानाधारक असलेल्या काही व्यापाऱ्यांनी मुख्य बाजारपेठेत, बसस्थानक परिसरात आणि इतर गर्दीच्या ठिकाणी अनधिकृतपणे तसेच अस्ताव्यस्त पद्धतीने अत्यंत ज्वलनशील आणि धोकादायक फटाक्यांची दुकाने उभारल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असल्यामुळे बीबी येथील प्रतिष्ठित नागरिक बद्रीनारायण बाहेती माजी ग्रामपंचायत सदस्य बीबी यांनी ग्रामपंचायत ,तहसीलदार ,मंडळ अधिकारी संबंधित प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर दुकानदारांनी त्यांच्या परवान्यातील कोणत्याही अटींचे पालन केलेले नसून सुरक्षेचे आवश्यक उपाय देखील राबवलेले नसून बीबी ग्रामपंचायतची कोणत्याही प्रकारची नाहरकत परवानगी न घेता ज्वलनशील स्फोटक फटाक्यांची दुकाने उभारली असून स्थानिक प्रशासनाची डोळे झाक केल्याचे पहावयास मिळते . जालना मेहकर राज्य महामार्गावर लागूनच उघड्यावर रस्त्याच्या कडेला बस स्थानक परिसरात ज्वलनशील फटाक्याची दुकाने थाटून विक्री करीत आहेत सदर फटाक्याची दुकाने मुख्य रस्त्यावर थाटल्यामुळे अपघाताचा आणि आगीचा मोठा धोका निर्माण झाला आहे .ये जा करणाऱ्या वाहनांच्या सायलेन्सर मधून पडलेल्या तिनग्यांमुळे मोठी आग लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही .आणि बस स्थानक परिसरात दिवाळीचा उत्सवामुळे वाहतूक वाढलेली असताना सुद्धा ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. आणि एखादा अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी कोण घेणार असाही प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच मालमत्तेला धोका निर्माण झाला असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वाटू लागली आहे. असे असतानाही ग्रामपंचायत तसेच प्रशासनाच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी ग्रामपंचायत ची कोणत्याही नाहरकत परवानगी न घेता उघड्यावर दुकाने लावली असून प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसून येत असून स्थानिक प्रशासन याकडे साप दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जर दुर्घटना घडली, तर जिवीतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.
याबाबत बद्रीनारायण गणेशलाल बाहेती यांनी लोणार तहसीलदार व बिबी ग्राममहसूल अधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, काही परवानाधारक व्यापाऱ्यांनी एकाच परवान्यावर दोन ठिकाणी दुकाने सुरु करून नियमांची उघडपणे पायमल्ली केली आहे.
स्थानिक प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई करून नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी केली आहे.

Post a Comment
0 Comments