महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजना लागू करण्यात आली असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील 28 हजार ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्राम रोजगार सेवक हे ग्रामपंचायत स्तरावर रोजगार हमीची घरकुल ,सिंचन विहिरी, फळबाग लागवड व इतर रोजगार हमी योजनेतील कामासाठी प्रत्यक्ष लाभार्थ्यासोबत संपर्क करून काम पूर्ण करण्यासाठी नियमित काम करीत आहेत.
रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांना 2.25,4 व 6 टक्के प्रमाणे कमिशन तत्त्वावर मानधन देण्यात येत होते.गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून रोजगार सेवकांना मासिक मानधन मिळावे यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. विधानसभा निवडणूक 2024 च्या पूर्वी ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्राम रोजगार सेवकांना मासिक मानधन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती .विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्र शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी ग्राम रोजगार सेवकांना 8 हजार रुपये मासिक मानधन व 2 हजार रुपये प्रोत्साहन व प्रवास भत्ता देण्याचा शासन निर्णय काढला.
शासन निर्णय काढल्यानंतर गेल्या 10 महिन्यापासून रोजगार सेवकांना कमिशन तत्त्वावरचे किंवा शासन निर्णयानुसार 10 हजार रुपये कोणतेच मानधन मिळाले नाही. मानधन मिळण्यासाठी अनेक वेळा निवेदने दिली मात्र ग्राम रोजगार सेवकांना मानधन मिळाले नाही त्यामुळे मेहकर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांनी 26 सप्टेंबर पासून जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन केले आहे. याबाबतचे निवेदन मेहकर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक यांच्या वतीने तहसीलदार मेहकर व गटविकास अधिकारी यांना देण्यात आले .यावेळी ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन खरात ,तालुका अध्यक्ष श्रीमंत देशमुख, तालुका सचिव संजय मोरे, उपाध्यक्ष प्रवीण ठोकळ, किशोर निकम सह ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments