बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२व्या जयंती उत्सवानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच सम्यक समन्वय समिती च्या वतीने भव्य मिरवणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगाव येथील परिषदेमध्ये घोषणा केली होती की "एक वेळ माझा जन्मदिवस साजरा करू नका, पण राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सणाप्रमाणे साजरी करा".
सामाजिक, शैक्षणिक, शेती, अशा विविध क्षेत्रात अद्वितीय असे कार्य केलेले महान बहुजनवादी, लोकशाहीवादी आरक्षणाचे जनक,राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152 व्या जयंतीनिमित्त सम्यक समन्वय समिती बुलढाणा च्या संपूर्ण टीम ने बुलढाणा शहरातील समस्त समविचारी संघटना, संस्था आणि बहुजनवादी,आंबेडकरवादी विचारधारेतील प्रतिष्ठित मंडळींना या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून आमंत्रित केले होते.
अल्पावधीत आयोजित केलेल्या या मिरवणुकीला शहरातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मिरवणुकीचा प्रारंभ महापुरुषांचे पुतळे जयस्तंभ चौक येथून झाला. जयस्तंभ चौकातील राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून यश सिद्धी सैनिक सेवा संघाच्या वतीने मानवंदना देऊन मिरवणूक मोठ्या शिस्तीने निघाली.
ढोल ताशा पथक, लेझीम पथक, त्या पाठोपाठ यश सिद्धी सैनिक सेवा संघाचे जवान, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा असलेला सुशोभित रथ, तदनंतर महिलावर्ग आणि पुरुषवर्ग असे मिरवणुकीचे स्वरूप होते.
बहुजनवादी लोक राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय या घोषणांनी मिरवणुकीत चैतन्य आले होते. एसबीआय चौक मार्गे मिरवणूक आयडीबीआय चौक छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा येथे आली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला सैनिकांची मानवंदना आणि मिरवणुकी मधील समस्त सहभागींनी अभिवादन केले आणि राष्ट्रगीताने मिरवणुकीचा समारोप झाला.
अत्यंत शिस्तबद्ध आणि हर्षउल्हासात निघालेल्या या मिरवणुकीचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.
शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम होत असतात पण बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन सम्यक समन्वय समिती बुलढाणाच्या वतीने करण्यात आले आणि हे आयोजन यशस्वीरित्या संपन्न झाले त्याकरिता सम्यक समन्वय समितीच्या संपूर्ण पदाधिकारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

Post a Comment
0 Comments