Type Here to Get Search Results !

मेहकर पोलिसांची धडक कारवाई,पोलीस अंमलदारावर हल्ला करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या


मेहकर, लोकतंत्र न्यूज नेटवर्क 

मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर भागात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या व त्यांना प्रतिकार करणाऱ्या पोलीस अंमलदारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांचा मेहकर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ अट्टल आरोपींना जेरबंद केले असून त्यांचे इतर साथीदार आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरातील मोठी घरफोडी टळली आहे. २२ मे रोजी ३:३० वाजताच्या सुमारास मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मीनारायण नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये काही चोरटे शिरल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना स्थानिक नागरिकांकडून मिळाली. माहिती मिळताच गस्तीवरील अधिकारी व चालकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केले. या झटापटीत चोरट्यांनी घटनास्थळावरून सुमारे ६,००० रुपये किमतीचे तीन तोळे चांदीचे दागिने आणि ६०,००० रुपये किमतीची एक ड्रीम युगा मोटारसायकल असा मुद्देमाल चोरून नेला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. तपासाबाबत योग्य मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या आणि आरोपींचा शोध घेण्याच्या कडक सूचना दिल्या.त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांनी एकूण ३ विशेष पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी रवाना केली.तपास पथकाचे प्रमुख सपोनि अशोक अवचार यांनी सिंदखेड राजा येथून आरोपी देशपालसिंग अजयपालसिंग भादा (वय २० वर्ष, रा. सिंदखेड राजा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने इतर ४ साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. निष्पन्न झालेल्या आरोपींपैकी दोन आरोपी 'बिबी' येथे लपून बसल्याची खात्रीशीर माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मेहकर येथील पोहेकॉ डिगांबर चव्हाण यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोनि व्यंकटेश आलेवार व बिबी पोलीस स्टेशनचे सपोनि चंद्रकांत पाटील यांना दिली. त्यानंतर बिबी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

   अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धर्मेंद्रसिंग कालूसिंग बावरी (वय २५ वर्ष) आणि अजितसिंग राजुसिंग टाक (वय २० वर्ष, दोघेही रा. बिबी) यांचा समावेश आहे.

अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात मेहकर पोलिसांना मोठे यश आले असून आतापर्यंत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित २ आरोपींच्या शोधासाठी मेहकर पोलीस स्टेशनचे २ पथके आणि एलसीबी बुलढाणाचे १ पथक रवाना झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि संदीप बिरांजे हे करत आहेत.सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोनि व्यंकटेश्वर आलेवार, सपोनि संदीप बिरांजे, सपोनि अशोक अवचार, सपोनि चंद्रकांत पाटील, पोउपनि किरण खाडे, पोउपनि प्रताप बाजड, पोउपनि परमेश्वर शिंदे, सफौ राजेंद्र काळे, पोहेकॉ लक्ष्मण कटक, पोहेकॉ विजय बैंडवाल, पोहेकॉ गवई, पोकॉ ताबेकर, पोकॉ अवचार, पोकॉ चिम, पोकॉ परसुवाले, पोकॉ नागरे, पोकॉ अरमाळ, पोकॉ लेकरवाळे, पोकॉ करीम, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ सूर्यवंशी, पोहेकॉ चव्हाण, पोकॉ बोरे, आणि पोकॉ जयवाल यांनी मिळून केली आहे.

Post a Comment

0 Comments