बुलडाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
ग्रामरोजगार सहाय्यक कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आमदार संजय गायकवाड यांच्या मध्यस्थीने स्थगिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून वेतनवाढ, सेवा अटींचे नियमितीकरण, मानधनातील तफावत दूर करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले असून संबंधित प्रश्नांबाबत शासन स्तरावर तातडीने पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.चर्चेनंतर ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत बळीराम देशमुख यांना शरबत देऊन आमदार संजय गायकवाड व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या हस्ते उपोषणाची सांगता करण्यात आली. ग्रामरोजगार सहाय्यकांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून लवकर निर्णय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. संवाद आणि समन्वयाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे हाच लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील असे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामरोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments