सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज
उत्कर्ष फाऊंडेशन सिंदखेडराजा, युवक बिरादरी भारत, श्री सत्यसाई विद्यामंदिर आणि स्व. दौलतराव ढवळे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २५ शिक्षकांचा लोणार सरोवर व सिंदखेडराजा अभ्यास दौरा दि. ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला.
या दौऱ्याचा उद्देश फक्त शिक्षकांना माहिती देणे एवढाच नसून, त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत लोणार सरोवराचे ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्त्व पोहोचविणे हा होता. नागपूर जिल्ह्यातील भूगोल अभ्यासक निलेश सोनटक्के आणि युवक बिरादरीचे संचालक डॉ. सचिन वाकुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.या अभ्यासक शिक्षकांनी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. आमदार खरात यांनी लोणार सरोवर, धार सरोवर, मातृतीर्थ सिंदखेडराजा — राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान, तसेच शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान या ठिकाणांची माहिती शिक्षकांना दिली.शिक्षकांनी लोणार सरोवराच्या परिसरात सहा किलोमीटर पायी भ्रमंती करून सरोवरातील जैवविविधता, भूगोल, शिल्पकला आणि हेमाडपंथी वास्तुकला यांचा सखोल अभ्यास केला. उल्कापातामुळे निर्माण झालेल्या या सरोवराशी निगडित पौराणिक कथा आणि सांस्कृतिक वारशाचा त्यांनी अभ्यास केला.दुसऱ्या दिवशी सिंदखेडराजा येथे माँसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळी व जिजाऊ सृष्टीला भेट देत त्यांनी जिजाऊंच्या शौर्यगाथा आणि कार्याची प्रेरणादायी माहिती जाणून घेतली.डॉ. वाकुळकर यांनी सांगितले की, “शालेय अभ्यासक्रमातून केवळ पुस्तकी ज्ञान मिळते, परंतु प्रत्यक्ष अनुभवातून जे शिकता येते ते ज्ञान चिरकाल टिकते. म्हणूनच अशा अभ्यासदौऱ्यांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्राधान्य द्यावे.”या उपक्रमात आमदार सिद्धार्थ खरात, जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम बोर्डे, अथर्व हॉटेलचे संचालक प्रा. गजानन खरात, वैभव देशमुख, तसेच तारामती जायभाये (महिला आघाडी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, लोणार) यांनी सहकार्य केले.या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले शिक्षक — प्रीती शिरसागर, शुभांगी वाटाणे, संजय खंडार, अंकुश कडू, शीतल राठोड, सुषमा चारपे, रंजना राऊत, करुणा कोल्हे, प्रफुल देवतळे, स्नेहा माने, प्रीती कोंडबटूलवर, चेतना असलकर, आकाश टाले, अश्विनी दळवी, शालिनी काळे, शुभम लोखंडे, प्रियांका गजभिये, मंजू घोटफोडे, श्रावणी साबळकर, शुभम देव्हारे, अर्चना तालखांडे, रश्मी वाटाणे, विक्की कडवे आदी शिक्षक उपस्थित होते.
या अभ्यासदौऱ्यामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना “ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव” मिळाला असून, अशा उपक्रमांमुळे लोणार सरोवराचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.


Post a Comment
0 Comments