बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
कैलास राऊत, मुख्य संपादक (दै.बातमी जगत)
महाराष्ट्राच्या कृषी जीवनातील एक अत्यंत हृदयद्रावक आणि चिंतन करण्याची वेळ आलेली घटना म्हणजे यावर्षीच्या दिवाळीतील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा. ज्या पिवळ्या फुलांना आपण लक्ष्मीचे प्रतीक मानतो आणि जेथे 'सोनं' ओतलं जातं, त्याच झेंडूच्या फुलांचा यंदा 'लाल चिखल' झाला आणि बळीराजाची दिवाळी अक्षरशः अंधाऱ्या, काळाकुट्ट स्वप्नांच्या घशात अडकलेली दिसली.
शेती म्हणजे जुगाराचा बाजार, ही म्हण शेतकऱ्यांच्या जीवनात किती खोलवर रुजली आहे, हे यंदाच्या झेंडूच्या भावाने पुन्हा एकदा सिद्ध केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला ₹६० ते ₹८० पर्यंत चांगला भाव मिळाला, तेव्हा शेतकरी राजा सुखावला. "दिवाळी, लक्ष्मीपूजन आणि देव दिवाळीला यापेक्षाही मोठा भाव मिळेल," या आशेवर त्याने झेंडूची झाडे जीवापाड जपली. चार महिने अहोरात्र कष्ट केले, कर्ज काढले, रात्र जागवली.
पण झालं उलटंच
ऐन लक्ष्मीपूजनाच्या काल (२२ ऑक्टोबर) दिवशी बाजारात फुलांची अशी काही आवक वाढली की, जे फुलं 'सोनं' म्हणून विकली गेली पाहिजेत, त्यांना कवडीमोल नव्हे, तर मातीमोल भावानेही कोणी विचारलं नाही. जे झेंडूचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्याला प्रति किलो ₹१५ ते ₹२० खर्च आला, त्याला बाजारामध्ये ₹२ ते ₹५ सुद्धा दर मिळेनासा झाला. ही परिस्थिती मेहकर बुलढाणा, देऊळगाव राजा ,सिंदखेडराजा ,लोणार ,सह अनेक तालुक्यात बघायला मिळाली.
कष्टाच्या 'पिवळ्या सोन्या'चा 'लाल चिखल'
ही केवळ आर्थिक हानी नाही, शेतकऱ्याची भावनिक आणि मानसिक तोडफोड आहे. डोळ्यासमोर 'पिवळे सोनं' अक्षरशः 'लाल चिखलात' मिसळून जात होतं. वाहतुकीचा खर्चही परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली फुलं बाजारात न नेता, थेट रस्त्यावर फेकून देण्याचा आणि फुकट वाटण्याचा निर्णय घेतला.
हा केवळ झेंडूचा प्रश्न नाही. हा 'नियोजन' आणि 'सरकारी धोरणांचा' प्रश्न आहे. जेव्हा सर्व शेतकरी एकाच वेळी एकाच पिकाकडे वळतात, तेव्हा त्यांच्या उत्पादनाला न्याय देणारी कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. कोल्ड स्टोरेज नाहीत, निर्यात धोरण प्रभावी नाही, आणि मालाला हमीभाव देणारा कोणी वाली नाही.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, हे नुसते बोलून उपयोग नाही. जेव्हा जगाचा पोशिंदाच 'मेटाकुटीला' येतो, तेव्हा व्यवस्था कुठे कमी पडली, याचा विचार करण्याची वेळ येते.
आज झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील दिवाळीचे स्वप्न तुटले आहे. या स्वप्नांचा विचार घेऊन, शासनाने आणि समाजाने तातडीने या संकटावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा हा 'लाल चिखल' शेतकऱ्याच्या आत्मविश्वासाला कायमचा गाडून टाकेल.

Post a Comment
0 Comments