बुलढाणा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नाफेडमार्फत खरेदी केलेल्या ज्वारीच्या थकित रकमेचे तत्काळ वितरण करण्याची मागणी स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी काकडे यांचेकडे निवेदनातून केली आहे. नाफेडमार्फत खरेदी केलेल्या ज्वारीच्या रकमेचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा झालेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकरी आपल्या कष्टाने पिकवलेल्या ज्वारीच्या विक्रीतून मिळणाऱ्या रकमेवर अवलंबून असतात. थकित रकमेमुळे त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन थकित रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, यांनाही पाठवण्यात आली आहे.स्वराज्य पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी नेहमीच पुढाकार घेतला असून, या मागणीद्वारे त्यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या ज्वारीच्या थकित रकमेसाठी आवाज उठवला आहे.यावेळी संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल पाटील वखारे, श्रीकृष्ण सपकाळ, शुभम वखारे उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments