सिंदखेडराजा, लोकतंत्र न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा तालुक्यात आज 15 सप्टेंबर रोजी ढगफुटी पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. प्रचंड पावसामुळे शेतं जलमय झाली असून शेतकरी हताश व संतप्त झाले आहेत.
पळसखेड चक्का येथील बालाजी सोसे, पांडुरंग सोसे यांनी सरकारला इशारा देत विचारलं –
“शेतकऱ्याला न्याय देणार की शेतकऱ्याचं रक्त पिणार? शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू सरकारला दिसत नाहीत का?”गेल्या तीन वर्षांपासून सतत ढगफुटी, अतिवृष्टी आणि गारपिटीचा तडाखा बसूनही शासन मदतीच्या बाबतीत मौन आहे.2023 मध्ये नेतेमंडळींनी गल्लीतून दिल्लीपर्यंत दौरे केले, आश्वासनांचा पाऊस पाडला, पण शेतकऱ्यांना 100% नुकसान झालं असूनही केवळ 79% मदतच मिळाली.अजूनही 2023 च्या नुकसान भरपाईचे पैसे प्रलंबित आहेत.दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाची नोंद घेणारी किनगाव राजा येथील पर्जन्यमापक यंत्रणेची आकडेवारी चुकीची असल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.
परिस्थिती गंभीर
पातळगंगा नदीला पूर आला असून उंब्रज–देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला.किनगाव राजा शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.शेतकऱ्यांनी सरकारकडे थेट सवाल केला – “न्याय मागायचा कुणाकडे?”शेतकरी योद्धा कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष बालाजी सोसे गेली दोन वर्षं सतत या अन्यायाविरोधात लढा देत आहेत. पण शासनाच्या कागदोपत्री आकडेवारीवर अवलंबून राहणाऱ्या दडपशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही.

Post a Comment
0 Comments